Ind-SA T20 : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होणार आहे.
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
एकदिवसीय विश्वचषकात खेळणाऱ्या बऱ्याचशा दिग्गज खेळाडूंना टी20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे टी20, एकदिवसीय आणि कसोटी संघासाठी बीसीसीआयने तीन कर्णधार नियुक्त केले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यानचा पहिला टी20 सामना (India vs South Africa T20 Series) डरबनमध्ये खेळवला जाणार आहे. पण हा सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांना झोपमोड करावी लागणार आहे. भारतात टी-20 सामन्यांची सुरुवात संध्याकाळी 7 किंवा 7.30 वाजता होते.
पण दक्षिण आफ्रिकेत ही वेळ बदलणार आहे. टी20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरुवात होणार आहेत. म्हणजे अर्धातास आधी रात्री 9 वाजता टॉस होईल. संपूर्ण चाळीस षटकांचा सामना झाल्यास. रात्री एक वाजता सामना संपेल.
पहिला सामना रविवारी आहे. म्हणजे सोमवारी कामावर जाण्याचा दिवस आहे. त्यामुळे सामना पाहायचा असेल तर थोडीशी झोप कमी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन टी20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
तीन टी20 सामने संपल्यावर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. तर 1 वाजात टॉसचा निर्णय होईल.
संपूर्ण 100 षटकं खेळवली गेल्यास हा सामना रात्री 9.30 वाजता संपेल. पण दुसरा आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता होईल. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत हा सामना रंगेल.