चिठ्ठीत नावं लिहिली, कोणालाही दोषी धरू नका म्हणत संपवलं आयुष्य, पुण्यात धक्कादायक घटना…

माफ करा, कोणालाही दोशी धरू नका, असे जमिनीवर लिहून ठेवत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अजून समोर आले नाही. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

ही घटना मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जुनी तांबे वस्ती परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत आकाश दिगंबर गोसावी (वय. ३०) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिगंबर गोविंद गोसावी (वय. ५५, रा. जुनी तांबे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, दिगंबर गोसावी यांना दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच ते सतत आजारी असल्यामुळे त्यांना अशक्तपणा असायचा.

मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश गोसावी यांना खोलीतील फरशीवर खडूने गौरी मुंगेरीलाल व आकाश मला माफ कर, असे लिहून आत्महत्या केली. याबाबत कोणालाही दोषी धरू नये, असेही लिहिले.

त्यानंतर घरातील दोरीच्या सहायाने दिगंबर गोसावी यांनी गळफास घेतलेला आढळून आला. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच गोसावी हे मृत झाल्याचे सांगितले. त्यांनी असा निर्णय का घेतला याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत त्यांची देखील चौकशी सुरू आहे. पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड पुढील तपास करत आहेत.