गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती.
गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी नार्वेकरांना हा निर्णय घ्यायचा आहे.
राहूल नार्वेकरांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना आणि ठाकरे गटातील १५ आमदारांना याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यामध्ये सात दिवसांमध्ये आमदारांना लेखी आपले म्हणणे मांडायचे होते. पण आता सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
४० आमदारांनी मुदत वाढ मागितली होती. ती मुदत वाढ त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपात्रतेबाबतचा निर्णय आणखी लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे. आता निकाल कधी लागेल हे सांगता येणंही कठीण होणार आहे.
१० ऑगस्टपर्यंत निर्णय दिला जाणार अशी चर्चा होती. कारण १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ३ महिने पुर्ण होतील. पण आता मुदत वाढ भेटली तर हा निर्णय आणखी काही काळासाठी पुढे जाऊ शकतो.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना पाठवलेल्या नोटीसीचा आढावा घेतला आहे. आपल्याला लगेच याबाबत बोलता येणार नाही. आम्हाला वेळ हवा आहे. आम्हाला मुदतवाढ हवी आहे, असे शिवसेनेच्या ४० आमदारांनी नार्वेकरांना सांगितले आहे. आता यावर राहूल नार्वेकर काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं असणार आहे.