Manoj Tiwary : दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे अन्…; निवृत्तीनंतर मनोज तिवारीच्या गौप्यस्फोटामुळे उडाली खळबळ

Manoj Tiwary : नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा बंगालचा फलंदाज मनोज तिवारी एकापाठोपाठ एक मोठी वक्तव्ये करत आहे. त्याने निवृत्तीनंतर लगेचच काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त विधाने केली आहेत. आता त्याने आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, अनेकदा अंपायर दारूच्या नशेत मैदानात येतात. खेळाडूंसोबत अंपायरचीही ‘डोप टेस्ट’ व्हायला हवी. एखाद्या खेळाडूची डोप चाचणी झाली तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायरपर्यंत जायला हवी. अंपायर नशेत मैदानात येतात आणि ते झोपलेले दिसतात.

तसेच तो म्हणाला, आयपीएल 2013 दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये गौतम गंभीरसोबत त्याचे भांडण झाले होते. मनोज तिवारी 2008 पासून आयपीएलचा भाग होता. आयपीएलच्या पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा भाग होता आणि नंतर 2010 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला.

2012 मध्ये त्यानेच अंतिम फेरीत विजयी धावा करून केकेआरला चॅम्पियन बनवले होते. पण 2013 मध्ये त्याची आपल्याच कर्णधाराशी अशी भांडणे झाली की त्याला केकेआर सोडावे लागले.

जेव्हा मी केकेआरमध्ये होतो तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये माझी गंभीरसोबत खूप भांडण झाली होती. ही गोष्ट कधीच समोर आली नाही. २०१२ मध्ये केकेआर चॅम्पियन झाला आणि मला आणखी एक वर्ष केकेआरकडून खेळण्याची संधी मिळाली. 2013 मध्ये जर मी गंभीरशी लढलो नसतो तर कदाचित मी आणखी 2-3 वर्षे कोलकाताकडून खेळलो असतो.

तसे झाले असते तर मला करारानुसार मिळणारी रक्कम वाढली असती, माझा बँक बॅलन्स बळकट झाला असता पण मी याचा कधी विचारच केला नाही. मनोज तिवारीने टीम इंडियासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

तो शेवटचा 2018 मध्ये आयपीएल खेळताना दिसला होता. मात्र, त्यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघासाठी मैदानात उतरला. त्याने अनेक सामन्यात आपल्या टीमला मोठी साथ दिली. यामुळे अनेक सामने जिंकले.