फक्त १२ जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदे गट संतापला, खासदार म्हणाला..

सध्या सर्वच राजकीय पक्षात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर संभाव्य जागावाटपावरुन नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महायुतीमधील जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यास लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे या वादाला यामुळेच सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे.

या जागा वाटपावर शिंदे गटाचे खासदार गजनान कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया देताना जागावाटपाचे हे सूत्र मान्य नसल्याचे सांगितले. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला इशाराच दिला आहे. जागा वाटप करताना शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये भाजपला ३२, शिवसेनेला १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असल्याचे समोर आले. याबाबत कीर्तिकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत ते म्हणाले, जागावाटप हे सूत्र कुठून आले मला माहीत नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला हे सूत्र मान्य नाही. २०१९ मध्ये आम्ही २२ जागा लढलो होतो, त्यात आम्ही ४ ठिकाणी हरलो. मग १२ जागा कशा घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत अजून एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान, कीर्तिकर हे जाहीर वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली होती, आता देखील त्यांनी जाहीर वक्तव्य केली आहेत.