सध्या लोकसभेची तयारी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस चा वापर करू शकतो, असा निर्णय देण्यात आला आहे.
जेव्हा निवडणूक आयोगाने पवार गटाला हे चिन्ह दिले होते तेव्हा त्याचा वापर राज्यसभा निवडणुकीपूरता वापर करण्याचे आदेश होते. आता हा निर्णय पुढे देखील कायम ठेवला आहे. तसेच निवडणूक आयोगने अजित पवार गटाला देखील महत्त्वाचे असे आदेश दिले आहेत. घड्याळ हे जरी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असले तरी यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरत असताना प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी तसा उल्लेख करावा असे सांगितले आहे. यामुळे अजित पवार गट कोणत्याही सभेत, जाहिरातीत, व्हिडिओमध्ये घड्याळ चिन्ह वापरले तेव्हा तेव्हा त्यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, असे सांगावे लागणार आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावेळी हा फोटो वापरू नका, असेही सांगितले गेले होते. न्यायालयाने तुम्ही आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असे लिखित द्या, असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता.
यामुळे अजित पवार गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असे न्यायालयामध्ये सांगितले आहे. यामुळे चिन्हाबाबत अजून येणाऱ्या काळात देखील घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.