नाथाभाऊंचा मोठा डाव! भाजपाचे टेंशन वाढलं, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात? नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुक सध्या जवळ येत आहे. यासाठी उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप  खासदार रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लोकसभेची लढत पार पडणार, अशी चर्चा होती. मात्र एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचे जाहीर केले. मात्र या मतदारसंघातून केवळ एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठीच भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती, अशी चर्चा सुरू आहे.

आता एकनाथ खडसे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी बोलताना थेट एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली.

यामुळे खऱ्या अर्थाने भाजपची अडचण झाली होती. नंतर भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि त्यात रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. असे असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ खडसे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले.

यामुळे भाजपची मोठी अडचण झाल्याचे पाहिला मिळाले. कारण आता इच्छा नसताना देखील रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर तर केली. परंतु आता त्यांचा पत्ता कट केला, तर आपोआपच राजकीय वर्तुळात भाजपची नाचक्की झाल्या शिवाय राहणार नाही, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांना आपले निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र एकनाथ खडसे हेच उमेदवार असतील असे लक्षात येताच त्यांना शह देण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीला डावलत एकनाथ खडसे यांच्या सून आणि सध्याच्या खासदार रक्षा खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

यामुळे एकनाथ खडसे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे सांगितले जात आहे. आता उमेदवार देखील बदलता येत नाही आणि बदलला तर बदनामी होणार, अशी वेळ भाजपवर आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे