धैर्यशील मोहिते- पाटलांचे ठरलं! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हातात घेणार? शरद पवारांचा निरोप…

माढा लोकसभा मतदार संघात सध्या घडामोडींना वेग आला असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याठिकाणी गुढीपाडव्यादिवशी तुतारी हातात घेण्याचा निर्णय झाला असून याच दिवशी उमेदवाराची घोषणा होणार आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय हा निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हा फलटणकर किंवा अकलूजकर त्यांच्यापैकी एक असणार आहे. येथील उमेदवार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हाती घेऊन रणशिंग फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा सुटणार असून, महायुतीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. यामुळे आता शरद पवार सावध भूमिका घेत आहेत. याठिकाणी शरद पवार यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

सध्या मोहिते पाटील हे दौरे करत आहेत. त्यांनी स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम यांची भेट घेतली. धैर्यशील मोहिते यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे निंबाळकर यांच्यासमवेत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आणि शिवसेना नेते शेखर गोरे यांची भेट घेतली.

यावेळी धैर्यशील मोहिते- पाटील म्हणाले की, जनतेला अपेक्षित असलेली भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले. याठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत झाली, तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी ठरणार नाही.

याठिकाणी मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर इच्छुक होते मात्र रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने हे नेते नाराज झाले आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.