माढ्यात शरद पवारांनी टाकला डाव, बडा नेता आणला आपल्या गटात, आता उमेदवारीही देणार?

माढा लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कोकाटे नाराज होते. कोकाटे यांना माढ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी अजूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले, सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील आदींचा पक्षप्रवेश झाला. कोकाटे यांनी माढा लोकसभेची तयारी सुरू केली होती.

असे असताना भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासूनच कोकाटे नाराज होते. भाजपचे काम शिवसैनिक करणार नाही, असा पवित्रा त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता.

अखेर त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. माढ्यामध्ये जर तुम्ही पक्ष संघटना बळकट केलीत, तर तुम्हाला कोणीही आव्हान उभे करू शकणार नाही.

सध्या सत्तेसाठी फुटून बनलेल्या पक्षातील अनुभव येत असल्याने हे लोक पुन्हा मूळ पक्षाशी जोडले जात आहेत. सध्या शरद पवार यांनी माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नाही. याठिकाणी आता कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.