Bihar : बिहारमधील सिवानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पती-पत्नी दोघांनी आत्महत्या केली. दोघांनी घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावात ही घटना घडली.
या घटनेने घरात शोककळा पसरली असतानाच गावातही खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये हिंदी रितीरिवाजांनुसार अमितचे लग्न झाले होते. त्याची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिवान जिल्ह्यातील जीबी नगर तरवारा पोलीस स्टेशन क्षेत्रातील महमदपूर गावात मे २०२२ मध्ये अमितचा विवाह झाला होता. पती-पत्नीने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येबाबत कुटुंबीय काहीच सांगत नाहीत.
बांगरा येथील रहिवासी विमल यादव यांचा मुलगा अमित यादव आणि अमितची पत्नी रुबी देवी असे मृतांची नाव आहे. पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पहिले पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असून रुबीच्या आई-वडिलांना ही बाब समजताच रुबीचे कुटुंबीय अमितच्या घरी आले आणि त्यांची या मुद्द्यावरून वादावादी झाली. त्यानंतर अमितने तत्काळ खोलीत जाऊन गळफास लावून जीवन संपवले.
घटनेनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी सिवान सदर रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, मात्र याप्रकरणी कुटुंबीय किंवा ग्रामस्थ काहीही सांगत नाहीत. या घटनेनंतर संपूर्ण गावातील लोक हादरले आहेत.