सलमान खानची Y+ कडक सुरक्षा भेदून ‘तो’ सेटवर आला अन् म्हणाला, ‘बिश्नोईला गॅंगला…’

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सेटवर घडलेल्या एका गंभीर प्रकाराने खळबळ उडवली आहे. दादर पश्चिम येथे सुरू असलेल्या सलमानच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने बेकायदेशीरपणे सेटवर प्रवेश केला.

सुरक्षा रक्षकांनी हटकल्यानंतर या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत धमकी दिली, ज्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. “बिश्नोईला सांगू का?” असे म्हणत या व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले आहे. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्राथमिक चौकशीत हा प्रकार एका चाहत्याचा होता, ज्याला सेटवरील शूटिंग पाहायचे होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारल्याने झालेल्या वादावादीत त्याने बिश्नोईचे नाव घेतले. ही व्यक्ती मुंबईची रहिवासी असून तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मागील काही वर्षांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांचा सामना करावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती, तर त्याच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमक्यांमध्ये सलमानला माफी मागण्यासाठी किंवा पैसे भरण्याचा इशारा देण्यात आला होता.

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. सलमान खानवरील सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून सेटवरील सुरक्षाव्यवस्थेत बदल करण्याची शक्यता आहे.