Nashik Accident : मनमाड-येवला राज्यमहामार्गावर घडलं भयंकर, पाच तरुणांचा रस्त्यावर तडफडून अंत

Nashik Accident : कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याची घटना मनमाड-येवला राज्यमार्गावर झाली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

पाचही जण नाशिकच्या गंगापूर येथील असल्याची माहिती आहे. मनमाडजवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे पाच तरुण तिकडे परतत असताना अनकवाडेजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा भुगा झाला आहे.

ही कार ट्रकखाली दाबली गेल्यामुळे तिचा चक्काचूर झाला. कार मधील पाचही तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ललित शरद सोनवणे, गणेश शरद सोनवणे (रा. पेठ रोड) या सख्ख्या भावांसह रोहित धनवटे, श्रेयस धनवटे आणि प्रतीक नाईक यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य राबवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, या घटनेमुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला.

दरम्यान, ग्रामस्थांना कार तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. याठिकाणी येवला तालुका पोलिस तातडीने दाखल झाले. सायंकाळची वेळ असल्याने अंधार आणि पावसामुळे मदतकार्य राबवण्यास देखील अडथळा येत होता.

दरम्यान, मृत तरुणांच्या नातेवाईकांची संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत. सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.