Abhishek Ghosalkar : घोसाळकरांच्या हत्येसाठी मॉरिसने वापरलेले पिस्तुल कुणाचं? धक्कादायक माहिती आली समोर…

Abhishek Ghosalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा याने हत्या करुन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

सध्या मुंबई पोलीस याप्रकरणी सखोल चौकसी करत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या हे पिस्तुल नेमके कुणाचे होते? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यामुळे याबाबत तपास सुरू झाला आहे. मॉरिस नोरोन्हा याने वापरलेले पिस्तुल सुरक्षा रक्षकाचे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे.

या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. मॉरिशच्या कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. मॉरिस वापरलेली पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याला परवाना नसल्याचे देखील पुढे आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मॉरिसकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नव्हता. मॉरिसने त्याच्याच सुरक्षा रक्षकाचे पिस्तुल घेऊन गोळीबार केला. मॉरिसने पाच गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकरांची हत्या केली. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याची माहिती आहे. उजव्या मांडीला दोन गोळ्या, पोटात एक आणि छातीच्या डाव्या बाजूला एक गोळी लागल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सर्व बडे नेते उपस्थित होते. या घटनेमुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे.