महाविकास आघाडीत पहील्याच दिवशी फुट, उद्धव ठाकरेंवर टिका करत ‘हा’ आमदार पक्षासह पडला बाहेर

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पराभवानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता होतीच. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आघाडीला आणखी एक झटका बसला आहे. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी या निर्णयाची घोषणा केली. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्ष नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध करत आझमींनी सभागृहात हजेरी लावली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेबाबत आझमींनी नाराजी व्यक्त केली. “शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर परत भर दिला आहे. मात्र, सर्व धर्मांना सोबत घेण्याचे वचन त्यांनी दिले नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे आम्ही आघाडीत राहू शकत नाही,” असे आझमींनी स्पष्ट केले.

६ डिसेंबरच्या बाबरी मस्जिद विध्वंसाच्या संदर्भात बोलताना आझमी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने दोषींना शिक्षा केली नाही, आम्ही विसरून पुढे जायला तयार होतो. मात्र, वारंवार जुन्या जखमांवर मीठ चोळले जाते. अशा परिस्थितीत आम्ही यापुढे महाविकास आघाडीत राहू शकत नाही.”

दहा दिवसांपूर्वीच अबू आझमी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी गेल्याचे आझमींनी सांगितले.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. अबू आझमी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख यांची निवड झाली आहे. आझमींनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रईस शेख यांची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.