हिमाचल प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी सहा बंडखोर आमदार ज्यांना अपात्र केले गेले होते, ते आमदार हिमाचल प्रदेशहून उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे पोहोचले असल्याचे सांगितले जाते.
या आमदारांबरोबर तीन अपक्ष आमदार आणि दोन भाजपाचे आमदार उपस्थित होते. यामुळे राज्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषिकेश येथील ताज हॉटेलमध्ये ११ आमदार मुक्कामी थांबले आहेत. पोलीस देखील याठिकाणी तळ ठोकून आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू नी सहा बंडखोर आमदारांबाबत नरमाईची भूमिका घेतल्यानंतर ही घडामोड घडली आहे. यामुळे आता राज्यात पुढील काही दिवसात राजकीय घडामोडी पुढे येतील. हरियाणा राज्याची नंबर प्लेट असलेली एक बस ऋषिकेशमधील ताज हॉटेलबाहेर असल्याची माहिती आहे.
या बसमध्ये पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ११ आमदार, ज्यामध्ये काँग्रेसच्या सहा बंडखोर, तीन अपक्ष आमदारांचा समावेश होता. तर दोन जण भाजपाचे आमदार असल्याचे सांगितले जाते. यामुळे सर्वांसाठी हा मोठा धक्का होता. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू हे दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते.
याबाबत येणाऱ्या काळात काही राजकीय रणनीतीबाबत चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक आणि राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा त्यांनी केली असल्याचे सांगितले जाते. सुख्खू म्हणाले की, या आमदारांना खासगी विमानाने चंदीगड विमानतळावरून अज्ञात ठिकाणी नेले गेल्याचे समजते.
चंदीडगच्या ललीत हॉटेलमध्ये ते आढळून आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी आणि तीन अपक्षांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. यामुळे अभिषेक मनु सिंघवी यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.