लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागेबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे २२ आणि १० जागांची मागणी केली. यामुळे भाजपने याला नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे.
पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांनी माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांना संधी मिळावी, अशी विनवणी केली आहे. याबाबत देखील भाजपने नकार दिला.
भाजपने शिंदेंना १० जागांचा प्रस्ताव दिला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड झालेल्या बैठकीत शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा केली. या बैठकीत अमित शहांनी शिंदे आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत जागावाटपात थोडी तडजोड करण्यास सांगितले.
दरम्यान, लोकसभेला थोडं समजून घ्या. विधानसभा निवडणुकीत नुकसान भरपाई करुन देतो, असा शब्द शहांनी दिल्याचं वृत्त आले आहे. राष्ट्रवादी लोकसभेच्या ८ जागा जिंकेल असा विश्वास अजित पवारांना आहे.
यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2019 मध्ये देखील उद्धव ठाकरे यांना असाच बंद दाराआड शब्द दिला आणि नंतर तो फिरवला, अशी चर्चा याबाबत यानिमित्ताने सुरू झाली आहे.