अजित पवार-फडणवीसांचं ठरलं, कोणाला मिळणार किती जागा? फॉर्म्युला आला समोर

अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यासर्व घडामोडी होत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनीही भविष्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरु केले आहे. त्यामुळे येत्या काळातील निवडणूकांसाठी फॉर्म्युला ठरला असल्याचीही चर्चा आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखीला राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या १३ जागा तर विधानसभेच्या ९० जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात सध्या ४८ लोकसभेच्या जाता आहेत. तर २८८ विधानसभेच्या जागा आहेत.

अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं होतं. आपण यावेळी विधानसभेच्या ९० जागा लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता लगेचच त्यांनी भाजपसोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे.

विदर्भ आणि शहरी भागात भाजपाला जागा मिळणार तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ज्याठिकाणी काँग्रेस आहे तिथे राष्ट्रवादीला जागा देण्यात येणार आहे, अशीही माहिती मिळत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांना ९० जागा देण्यात येईल की नाही याबाबत माहिती नाही. जागांबद्दल काय चर्चा झाली माहिती नाही. तसेच ते माझ्या अधिकारामध्ये येतही नाही. पण निवडणूक लागल्याशिवाय त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.