अजितदादांचे बंड फेल ठरणार? आमदारांचा ‘हा’ आकडा पाहून अजितदादा गट अस्वस्थ; गुप्त बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे.

अशात आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. किती आमदार अजित पवारांसोबत आहे हे आजच्या बैठकीत स्पष्ट होणार होते. पण बैठकीचे वातावरण पाहता अजित पवारांचे हे बंड त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अजित पवारांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला कमी आमदार आल्यामुळे अजित पवार हे खुप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे एमईटीमध्येच त्यांनी त्यांच्या गटाची एक गुप्त बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी आमदारांबाबत चर्चा केली आहे.

यावेळी अजित पवारांनी सर्व आमदारांना बैठकीत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच जे या बैठकीला हजर राहणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे. यासर्व गोष्टींमुळे अजित पवार खुप अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज मेळावा आणि बैठक घेतली आहे. या मेळाव्याला मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण फक्त २९ आमदारच मेळाव्याला पोहचले होते. त्यामुळे अजित पवार यांची चिंता वाढली आहे.

अजित पवार यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. तसेच त्या आमदारांनी प्रतिज्ञापत्रही अजित पवारांकडे सादर केल्याचे त्यांनी म्हटले होते. पण बैठकीला २९ आमदारच आले. त्यामुळे अजित पवारांनी इतर आमदारांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले.

दरम्यान, आमदार आले नाही, तर बंड अयशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राष्ट्रवादीकडे ५४ आमदार आहे. त्यापैकी अजित पवारांना दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंब्याची गरज आहे. पण तितके आमदार आले नाही, तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो.