महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘झी गौरव पुरस्कार २०२४’ या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांची मनमोकळी मुलाखत घेतली. अजितदादांनी सुपुत्र पार्थ पवार, खासदार भगिनी सुप्रिया सुळे, राजकीय भूमिका यावरील प्रश्नांना उत्तरं दिली.
यावेळी मात्र एक वेगळी गोष्ट घडली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुप्रिया सुळे ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सहभागी झाल्या असता, त्यांना अजितदादांचा व्हिडिओ दाखवला होता, ज्यावर एक हजारों में मेरी बहना है, हे गाणं लावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
दरम्यान, यावेळी अजितदादांना हा व्हिडिओ दाखवण्यात आला. कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधूत गुप्ते यांनी ‘थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल’, असा प्रश्न विचारला तेव्हा अजितदादांनी पार्थ पवार यांचे नाव घेतले. यामुळे याचीही चर्चा रंगली.
तसेच रिमोट कंट्रोल कोणाला द्यावा, असे विचारले असता तो माझ्याच हातात राहू द्या, असेही दादा यांनी सांगितले. यामुळे एकच हशा पिकला. मी इतकी वर्ष वडिलधाऱ्यांचा आदर करत आलो आहे, यापुढेही वडिलधाऱ्यांचा आदर करत राहणार आहे.
आपली महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. पण पाठीमागच्या काळात आम्हाला जी विचारधारा योग्य वाटत होती, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्या रस्त्यावर चालत आहोत, ती योग्य आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
तसेच जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असे विचारल्यावर अजितदादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचे नाव घेतले. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्री देखील करून दाखवली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.