अजित पवार बंडखोर आमदारांसह पुन्हा पवारांच्या भेटीला, शरद पवार माघार घेणार?

रविवारी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील मंंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. ते अचानक न काही सांगता शरद पवार यांच्या भेटीसाठी चव्हाण सेंटरमध्ये पोहतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते.

अशात आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी अजित पवार आणि त्यांचे मंंत्री शरद पवारांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्यात तासभर चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत.

शरद पवार हे लवकरच मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहे. आता त्या सेंटरमध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते उपस्थित झाले आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे नेते सुद्धा तिथे उपस्थित आहे.

शरद पवार बंडखोर आमदारांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते आता कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शरद पवार आधी सिल्वर ओकवर होते. त्यानंतर ते आता चव्हाण सेंटरवर जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

रविवारी झालेली ही भेट ठरवून झालेली नव्हती. पण आज असलेली भेट ही नियोजित भेट असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आधी आमदार चव्हाण सेंटरला पोहचले आणि त्यानंतर शरद पवार त्यादिशेने निघत असल्यामुळे राष्ट्रवादीत नक्की काय सुरु आहे असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

रविवारी झालेल्या भेटीत मंत्र्यांनी यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. पण पवारांनी त्यावर काहीही भाष्य केले नव्हते. पण आता शरद पवार चर्चा करणार असल्यामुळे पवार बॅकफुटवर जाणार का? पवार भाजपसोबत जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.