नागपूरमधल्या एका भाजप महिला पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची बातमी समोर आली होती. सना खान असे तिचे नाव होते. ती जबलपूरला आपल्या मित्राला भेटायला गेली असताना तिथे तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सना खानचा मित्र अमित साहूला जबलपूरमधून अटक केली आहे. एकदिवसाआधीच सना खान बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते.
१ ऑगस्टला सना खान एका कामानिमित्त जबलपूरसाठी निघाली होती. २ ऑगस्टला ती जबलपूरला पोहचली असल्याचे तिने फोन करुन आपल्या आईला कळवले होते. पण त्यानंतर तिचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तिचे कुटुंब खुप चिंतेत होते.
सना खानच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तिला शोधण्यासाठी जबलपूरला रवाना झाले होते. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते की ती अमित साहूच्या घरी गेली आहे. कारण तो तिचा बिझनेस पार्टनर होता.
त्यामुळे पोलिसांनी थेट अमित साहूच्या घरी धाव घेतली. पोलिस आली तेव्हा अमित घरी नव्हता. अशात शोध घेत असताना अमितच्या कारमध्ये सनाचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिसले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नोकराला अटक केली आणि अमितचा शोध सुरु केला. आता पोलिसांनी अमितला एका ढाब्यावरुन अटक केली आहे.
पोलिसांनी अमितला नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्येची कबूली दिली आहे. हत्येच्यावेळी अमितसोबत त्याचा आणखी साथीदारही होता. त्याचेही नाव अमित साहूने घेतले आहे. सध्या पोलिस सनाचा मृतदेह शोधत आहे.
याप्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागपूर भाजपकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहीण्यात आले आहे. ९ दिवस होऊनही महाराष्ट्र पोलिस आणि मध्य प्रदेश पोलिसांना सनाचा मृतदेह शोधता न आल्यामुळे ते ही मागणी करत आहे.
अशात पोलिस चौकशीमध्ये एक धक्कादायक खुलासाही झाला आहे. सना खानने चार महिन्यांपूर्वी अमितशी लग्न केले होते. आरोपीचे हे दुसरे लग्न होते. त्याच्याआधी त्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याशी लग्न केले होते. पण दोघांचे वाद होत असल्यामुळे तिने त्याला घटस्फोट दिला होता.