राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा गट आहे तर दुसरा अजित पवारांचा गट आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत सामील झाल्याचीही चर्चा आहे.
अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर अनेक दिवसांपासून लागत होते. पण आकडा नसल्याचे कारण देत अजित पवार मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्याला बगल देताना दिसून येत होते. पण आता ते सत्तेत आले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आणि ४० आमदारांनी बंड करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. अजित पवार निधी देत नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण आता तेच अजित पवार हे सत्तेत सामील झाले आहे.
अजित पवार आल्यामुळे शिंदेंच्या काही आमदारांना मंत्रिपदंही गमवावी लागली आहे. त्यामुळे ते आधीच चिंतेत आहे. असे असतानाच आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता आणखी वाढली आहे.
अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. आज अजित पवारांचा वाढदिवसही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहे. अशातच अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. ते दिल्लीला भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्यानंतर लगेचच अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या भाषणाच्या काही व्हिडिओ आहेत.