वाल्मिक कराडवर मोक्का लागताच अवघ्या 10 मिनिटांत परळी झाली बंद! जाळपोळ अन् दहशत..

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मास्टरमाइंड म्हणून संशयित असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका लागू करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात कराडची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज बीडच्या केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.

न्यायालयाने कराडवर मकोका लावण्याचा निर्णय घेत, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या निर्णयानंतर कराडसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात असून, यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

कराड समर्थकांचा आक्रमक मोर्चा, परळी बंद

कराडवर मकोका लागू होताच अवघ्या काही मिनिटांतच परळीत कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन सुरू केले. समर्थकांनी परळी बंदची हाक दिली असून, मेडिकल आणि दवाखाने वगळता संपूर्ण परळीतील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परळी पोलीस ठाण्यासमोर समर्थकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामान्य लोकांना वेठीस, परळीत गोंधळ

समर्थकांच्या या आक्रमकतेमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. समाजकंटकांनी गुन्हेगाराला वाचवण्यासाठी लोकांना वेठीस धरल्याने, कराडच्या मागे मोठा हात असल्याची शंका निर्माण झाली आहे. परळीत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महिलांचे आत्मदहनाचा प्रयत्न, जाळपोळ

कराड समर्थकांची आंदोलने अधिक तीव्र होत चालली आहेत. महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर काही समर्थक टावरवर चढले. काही ठिकाणी जाळपोळही झाली आहे. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे.

कराडची कोट्यवधींची मालमत्ता उघड, पुण्यातील दुसऱ्या पत्नीच्या नावावर

दरम्यान, पुण्यात वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे, ज्यामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे.

परळीतल्या या परिस्थितीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, कारण कराड समर्थकांच्या आक्रमकतेने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.