बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वादंग निर्माण झाला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ त्यांना ग्रुपमधून काढून टाकले.
मुंडे यांची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली असून, पोलिसांकडून खासदारांविरोधात केलेली ही पोस्ट खळबळजनक मानली जात आहे. गणेश मुंडे यांनी शनिवारी ग्रुपवर केलेल्या पोस्टमध्ये बजरंग सोनवणे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर…”. ही पोस्ट केल्यानंतर काही पत्रकारांनी त्या खासदाराबाबत चौकशी केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी मुंडे यांना ग्रुपमधून काढले.
दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात कठोर कारवाईसाठी सोनवणे यांनी सातत्याने मागणी केली आहे.
हत्येच्या प्रकरणातील तीन आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. व्ही. पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक प्रयत्नशील असून, मुख्य आरोपी सुदर्शन घुले अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.