मणीपूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावताच भडकला भाजप नेता, म्हणाला आता कोर्टानेच..

मनिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपुर्ण देश हादरला आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारांवर कारवाई करा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही या व्हिडिओची तातडीने दखल घेत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करावी नाहीतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करु, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी धक्कादायक ट्विट केले आहे. सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर त्यांनीच देश चालवावा असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवााव. कशाला हव्यात निवडणूका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली तर देश कसा सुरळीत चालेल, असे वादग्रस्त ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. तो व्हिडिओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. सरकारने पुढे येऊन पावले उचलली पाहिजे, कारवाई केली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर भातखळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपुर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडीच महिन्यानंतर मणिपूरवर भाष्य केले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडण्यात येणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.