Bangalore news : मुलीला खाऊ घातलं, गेम्स खेळला, जोराची मिठी मारली अन् सगळं संपवलं, वडिलांनी अस का केलं?

Bangalore news : बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी बापानेच पोटच्या दोन वर्षीय चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र, तो त्यातून वाचला.

याबाबत त्याने धक्कादायक कारण सांगितले आहे. मुलीला खाऊ घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याने हा निर्णय घेतल्याचे मुलीच्या बापाने सांगितले आहे. कोलार येथील केनदट्टी गावातील तलावात मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

याठिकाणी एक कारही पोलिसांना सापडली आहे. हे पाहून गावातील लोकांनी कोलार पोलिसांना माहिती दिली. यामुळे याठिकाणी तपास सुरू होता. त्यानंतर आरोपी वडिलांना बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली होती.

आरोपी वडिल मुलीसह बेपत्ता होता. राहुल परमार असे आरोपीचे नाव आहे. तो गुजरातहून पत्नीसोबत बेंगळुरूला राहण्यासाठी आला होता. याठिकाणी तो आपल्या मुलीसह बेपत्ता झाला. याबाबत पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याने मुलीला शाळेत नेले. त्याला आत्महत्येची इच्छा होती, पण मुलीसमोर असल्याने तो निर्णय घेऊ शकला नाही. नंतर दिवसभर तो इकडे तिकडे फिरला. संद्याकाळी तलावाजवळ गाडी थांबवून तो बराच वेळ काय करावे याचा विचार करत राहीला.

दरम्यान, मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे खरेदी केली. पण मुलीला दुपारपासून भूक लागली होती म्हणून ती रडतच राहिली. तिच्यासोबत गेम खेळला आणि बराच वेळ तिला मिठीत घेत राहीला. अखेर त्याने जोराची मिठी मारल्याने दोन वर्षांची चिमुरडी गुदमरली. नंतर त्याने देखील तलावात उडी मारली. मात्र तो वाचला.