मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे अखेर ठरली, विधानसभा निवडणुकीपूर्वीच घोषणा….

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात बारा जागांबाबत राज्यपालांना लिस्ट देण्यात आली होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले नंतर भाजप सत्तेत आली. नंतर अजित पवार देखील सत्तेत गेले.

यानंतर देखील हा प्रश्न तसाच राहिला. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे यामध्ये कोणाची वर्णी लागली याची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तसेच माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात येत आहे. आज हे सातही आमदार शपथ घेतील. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये 12 पैकी 7 आमदारांचा शपथविधी पार पडेल. विधीमंडाळत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं जाहीर केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक होण्याची चर्चा आहे. यावर कोर्टात देखील सुनावणी सुरू आहे. याबाबत ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असतानाच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मिटवला आहे.