सध्या मनोज जरांगे आणि सरकारमध्ये वाद वाढत चालले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. असे असताना जरांगे देखील सरकारला धारेवर धरत उत्तर देत आहेत.
आज प्रवीण दरेकर यांनी शरद पवार मनोज जरांगेंना रोज फोन करतात असा आरोप केला आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी सांगितलं, मी कोणाचीच मदत घेतली नाही. जे कोणी मला भेटण्यासाठी येत होते, त्यांना भेटत होतो, असेही ते म्हणाले.
तसेच मला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, एकनाथ शिंदे, अजित पवार, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले अशा सर्वांचीच साथ आहे. पण मदत कोणाचीच नाही आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तसेच मी आता जेलमध्ये जायला तयार आहे. ज्याला कलंक नाही तो भीतच नसतो. मी सटकणार नाही, तर तुमच्या समोरुन जाणार. माझी मान कापली, जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी भीत नाही. मराठा समाजासाठी मला पवित्र मरण येईल.
तसेच फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसमुळे मला मरण यायला लागले आहे, छत्रपतींवरही एक वार झाला होता, असेही ते म्हणाले. मराठा समाजासाठी लढताना मृत्यू झाला तर, असलं मरण येण्यास भाग्य लागतं असेही ते म्हणाले. सध्या ते उपचार घेत आहेत.
फडणवीस सर्व मराठा आमदारांना हाताशी धरुन मला मारणार आहे. मी हसत मरेन, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे ते काय भूमिका घेणार लवकरच समजेल. राज्यात आता मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे.