Delhi : राजधानी दिल्लीतील जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे नावाच्या हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर प्रियकरानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ईशान्य दिल्लीतील जाफराबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.
मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे हॉटेलमध्ये चेकआउटच्या वेळी एक जोडपे खोलीतून बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर खोलीचा दरवाजा उघडला असता, दोन्ही जोडपे मृतावस्थेत आढळून आले. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत 27 वर्षीय आयशाचा मृतदेह बेडवर पडला होता, तर तिचा प्रियकर सोहराबचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेला होता.
प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुपारी एकच्या सुमारास हे जोडपे हॉटेलमध्ये पोहोचले.
हॉटेल कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने 4 तास खोली बुक केली होती, मात्र रात्री 8 वाजेपर्यंत हे जोडपे रुममधून बाहेर न आल्याने स्टाफने रुमचा दरवाजा ठोठावला. आतून आवाज न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ जाफ्राबाद पोलिस ठाण्यात माहिती दिली.
जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गेट उघडले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटवर लिहिले होते – आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.