शिरूर मधील बडे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत त्यांचा तपास सुरू आहे. त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात ५ कोटी ६० लाखांची रोकड तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली.
चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरा ईडीने बांदल यांच्यावर अटकेची कारवाई केली. यामुळे याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ईडीने बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकले होते. यावेळी संपत्तीबाबत तपास सुरू करण्यात आला होता.
१६ तासांची चौकशी झाल्यानंतर ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले. यावेळी बांदल यांच्या घरात काही महत्त्वाचे कागदपत्रे तसेच ५ कोटी ६० लाखांची रोकड आढळून आली. यामुळे अधिकारीही चक्रावले. आता वस्तूंच्या तपास आणि मूल्य याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी आणि दोन भावांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
नंतर पुण्यातील महंमदवाडी येथील बंगल्यावर जाऊनही पथकाने झाडाझडती घेतली. सध्या बांदल यांना अटक करून मुंबईत आणले आहे. या कारवाईमुळे शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात बांदल जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते.
काही दिवसांपूर्वीच ते बाहेर आले होते. नंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते. वंचितने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना शिरूरची उमेदवारी दिली होती. मात्र वंचितने त्यांची उमेदवारी मागे घेतली होती. याची बरीच चर्चा झाली होती.
दरम्यान, बांदल हे फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याची सातत्याने चर्चा होत असते. तुरुंगातून बाहेर पडून त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्यासाठी नेतेमंडळींची भेट घेतली. पण त्यांना कोणत्याही पक्षाने सक्रीय राजकारणात संधी दिली नाही. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.