CBI चा छापा अन् कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट

सीबीआयने काल नवी मुंबईतील कस्टम अधीक्षक मयंक सिंग यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी कस्टमचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांनी आत्महत्या केली आहे. मयंक सिंगने छाप्याच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याने तळोजा येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयने मयंक सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. छाप्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी या अधिकाऱ्याने आत्महत्या केली. मयंकने लाच घेऊन सीमाशुल्क विभागात प्रलंबित असलेली दोन बिले मंजूर केली होती. या आत्महत्येप्रकरणी खारघर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.

याप्रकरणी पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्याने लिहिले आहे की, सीबीआयने आपल्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे आपल्याला लाज वाटत होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते.

त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सुसाईड नोट मिळाली आहे. आम्ही या प्रकरणी एडीआर नोंदवला असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते.

मयंक यांची गाडी त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती. खारघर येथील तळोजा तुरूंगाजवळील तलावात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.