World Cup 2023 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
बुधवारी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भारत अंतिम सामना हरला कारण हा सामना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त होता.
सरमा म्हणाले, “आम्ही प्रत्येक सामना जिंकलो, पण फायनल हरलो. आम्ही सामना का हरलो याची मी चौकशी केली. मला आढळले की विश्वचषक फायनल इंदिरा गांधींच्या वाढदिवसाला खेळली गेली. आम्ही इंदिरा गांधींच्या वाढदिवसाला विश्वचषक फायनल खेळलो आणि हरवलो.”
गांधी कुटुंबावर हल्ला करताना सरमा म्हणाले, “माझी बीसीसीआयला विनंती आहे. कृपया, ज्या दिवशी गांधी कुटुंबीयांचा वाढदिवस असेल त्या दिवशी भारताने सामने खेळू नयेत. मी विश्वचषक फायनलमधून हे शिकलो आहे.”
19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषक फायनलमधील भारताच्या पराभवाला राजकीय वळण लागले जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनौती’ म्हटले आणि मोदींच्या स्टेडियमला भेट दिल्यामुळे भारत सामना हरला असा आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते. भारताच्या पराभवानंतर ‘पनौती’ हा शब्द इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. राजस्थानमधील एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने बुधवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.