बांगलादेशमध्ये घडत असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे संपूर्ण जग हादरुन गेले आहे. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडला असून त्या भारतात अज्ञात स्थळी आहेत. त्यांनी देश सोडल्यानंतर हिंसाचारामुळे बांगलादेशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे.
देशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाची आणि त्यांच्या मुलाची जमावाने हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कोलकात्यासह अवघे पश्चिम बंगालही हादरुन गेले आहे. याबाबत भयंकर माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील निर्माते-दिग्दर्शिक सलीम खान अशी त्यांची नावे आहेत. जमावाने त्यांची हत्या केली आहे. शांतो आणि सलीम त्यांचा जीव वाचवण्यासाठी गावाहून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी जमावाने त्यांना गाठले. दोघांनाही मरेपर्यंत मारहाण करण्यात आली.
त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. घटनेनंतर पश्चिम बंगाल आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीदेखील हादरुन गेली आहे. सलीम हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक होते. चंदपूरमध्ये ही घटना घडली. जेव्हा हिंसा वाढली तेव्हा ते दोघे घरात होते, त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी बलिया युनियनच्या फरक्काबाद मार्केटमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात ते अडकले. दोघेही बागारा मार्केटमध्ये पोहोचले असता त्याठिकाणी त्यांना जमावाने घेराव घातला. दोघांनी गर्दीतून बाहेर पडण्यासाठी गोळीबारही केला. यानंतर जमावाने दोघांवर हल्ला केला आणि अखेर त्यांचा जीव घेतला. यामध्ये त्यांचा जीव गेला.
दरम्यान, बांगलादेशमध्ये सध्या अजूनही हिंसाचार सुरूच आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. यामुळे अनेकजनांचे जीव जात आहेत. या घटनेने सगळे हादरले असून परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार याबाबत ठोस निर्णय होत नाही.