सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजून एकमत झाले नसल्याचे चित्र आहे. अशातच भाजपने मित्र पक्षांना फारच कमी जागा देणार असल्याची माहिती आहे.
यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे. यावरून शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी भाजपावरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला त्रास दिला जातोय, असा आरोप शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केला आहे.
याबाबत कदम म्हणाले, भाजपाने केसाने गळा कापू नये, अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवावं. महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, असेही ते म्हणाले. यामुळे आता त्यांच्यात वाद असल्याचे दिसून आले आहे. आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं माझं मत आहे, असेही ते म्हणाले.
तसेच मागील निवडणुकीत काय झालं याची मला माहिती नाही. परंतु, पुन्हा एकदा आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.