क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूची कॅन्सरशी झुंज अपयशी, वयाच्या ४९ व्या वर्षी निधन

झिम्बाब्वेचा महान अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. नुकतीच हीथ स्ट्रीक यांच्या निधनाची बातमीही समोर आली होती पण ती बातमी खोटी होती. नंतर त्या वृत्तावर खुद्द क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली.

पण आता हीथ स्ट्रीक या जगात नाही. स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी ६५ कसोटी आणि १८९ वनडे सामने खेळले आहेत. स्ट्रीक हे कोलन आणि यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते आणि दक्षिण आफ्रिकेत उपचार घेत होते. हीथ स्ट्रीकची पत्नी नादिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून क्रिकेटरच्या निधनाची बातमी दिली आहे.

तिने एक भावनिक पोस्ट लिहिली, “आज पहाटे रविवार ३ सप्टेंबर २०२३, माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून देवदूतांकडे गेला आहे. त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. कुटुंबाकडून प्रेम हवे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू..”

स्ट्रीक दीर्घकाळापासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होता, स्ट्रीकने कसोटी क्रिकेटमध्ये 216 विकेट घेतल्या आणि फलंदाजीत 1990 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये 239 विकेट घेतल्या आणि 13 अर्धशतकांच्या मदतीने 2943 धावा केल्या.

तो झिम्बाब्वेसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. स्ट्रीकने 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी झिम्बाब्वेने 18 सामने जिंकले तर 47 सामने गमावले. तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.

स्ट्रीकने 21 कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे कर्णधारपदही भूषवले, त्यापैकी चार सामने जिंकले आणि 11 सामने गमावले. 6 सामने अनिर्णित राहिले.