Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुलाचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे.
कुशाग्र असे या मुलाचे नाव असून या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कुशाग्र हा रुचिता नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी जात होता. तो आपली स्कुटर घेऊन ट्युशनसाठी घरातून निघाला होता. मात्र रात्रीपर्यंत तो घरी आला नाही. यामुळे त्याचा तपास सुरू होता.
असे असताना अचानक त्यांच्या घरात एक व्यक्ती चिठ्ठी टाकून पळून गेला. या चिठ्ठीत ३० लाखांची खंडणी देण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर त्याचा तपास सुरू झाला.
चौकशी केल्यानंतर पोलिसांना कुशाग्रचा मृतदेह सापडला. कुशाग्रचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरातील स्टोअर रुममध्ये सापडला होता. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. ट्युशन टिचरचा प्रियकर प्रभातने कुशाग्रचा गळा घोटून खून केला होता. त्यांनी कट रचून कुशाग्रची हत्या घडवून आणली होती.
या प्रकरणात प्रभातचा मित्र आर्यनने त्याला साथ दिली होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कुशाग्रचे रुचितासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रभातने त्याची हत्या केली. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हत्येनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने खंडणीचे नाटक रचले. पोलिस अपहरणाच्या अँगलने तपास करतील आणि आपण सहीसलामत सुटू या विचाराने प्रभातने कुशाग्रच्या घरी खंडणीचे पत्र पोहोचवले. मात्र त्यांचा प्लॅन फसला.