मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला, शीर अर्पण करण्याच्या नादात घडलं भयंकर…

मध्य प्रदेशमधील सतना येथील शारदा माता मंदिरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका तरुणाने स्वत:चा गळा चिरल्याची घटना घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

तरुणाने स्वत:सोबतच हे कृत्य केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. लल्लाराम दहिया असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना अंधश्रद्धेमधून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शारदा मातेच्या मंदिरामध्ये हवन कुंडासमोर या व्यक्तीने आपल्या मानेवरुन धारधार वस्तू फिरवली.

यावेळी उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याच्या मानेवरुन रक्त वाहू लागल्याने मंदिरात एकच गोंधळ उडाला.

काही क्षणांमध्ये मंदिरातील हवन कुंडाजवळची जमीन लाल रंगाची झाली. मंदिरात त्यावेळी उपस्थित असलेल्या काही भक्तांनी तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप रक्त वाहून गेले होते.

असे असताना मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. आपलं शीर मातेच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. लल्लारामच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आले.

पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून लल्लारामने गळा चिरला तेव्हा मंदिरात उपस्थित असलेल्या साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यापासून सीसीटीव्ही फुटेजपर्यंतचे पुरावे गोळा केले जात आहेत. याबाबत त्याच्या कुटूंबाला माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.