Delhi : दिल्लीतील एका हॉटेलच्या खोलीत विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघांनीही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. उघडकीस आलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
सोहराब (वय २८) आणि आयशा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई मृत आयशा हिचे मेरठ येथील सोहराब (28) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. 27 ऑक्टोबरला दोघांनी एका हॉटेलमध्ये 4 तासांसाठी रूम बुक केली.
मात्र, 4 तास उलटूनही दोघेही बाहेर न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता खोलीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांना त्यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी आयेशाच्या पतीकडे चौकशी केली.
आपण सोहराबला ओळखत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दुसरीकडे पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. बुधवारी पोलिसांना दोघांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाले. या अहवालातून आयेशाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सोहराबचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे समोर आले आहे. सोहराबने प्रथम आयेशाची हत्या केली. यानंतर त्याने गळफास लावून घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती उपलब्ध आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.