Datta Gade : पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात काही दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्कारप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, आता या प्रकरणातील आरोपीच्या वकिलावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्वारगेट प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याचे सहायक वकील साहिल डोंगरे यांच्यावर सोमवारी संध्याकाळी हडपसर येथून अपहरण करून गंभीर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी डोंगरे यांना बोपदेव घाटात नेऊन बेदम मारहाण केली आणि नंतर दिवे घाटात सोडून दिले. जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक बलात्कार प्रकरण
२५ फेब्रुवारीच्या पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती. फलटणला जाणाऱ्या या तरुणीला आरोपी दत्ता गाडे याने फसवणूक करून चुकीच्या शिवशाही बसमध्ये नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केले.
या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला, आणि संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. पुणे पोलिसांनी तातडीने तपास करून २८ फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःला बस कंडक्टर असल्याचे भासवले आणि बसमध्ये इतर प्रवासी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस पूर्णतः रिकामी होती. जेव्हा तरुणीने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि मारहाणही केली.
या संपूर्ण घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.