अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. पण बहुमत असतानाही भाजप-शिवसेनेने अजित पवारांना सत्तेत का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.
अशात अजित पवारांना सत्तेत का घेतलं? यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजपने आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदारांशी चर्चा केली आहे.
राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांचा आहे. तो आपल्याला मान्य करुन स्वागत करायला हवं. मोदींना साथ देण्यासाठी जे सोबत येत आहे, त्याचे स्वागत करा. पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत म्हटले आहे.
तसेच पंतप्रधान मोदींच्या अभियानाचे आणखी १० दिवस वाढवा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम खालपर्यंत राबवा. संघटना काम करत असताना लोकप्रतिनिधींनी पण भक्कम साथ द्या. तुमची ताकद एकत्र करा, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
सर्वांना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना भेटण्याची गरज आहे. त्यांना भेटा. विरोधक एकत्र येतील त्यांचा सामना करा. ते कितीही एकत्र आले तरी त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी जोमाने काम करा, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
तसेच भाजप पक्ष फोडतंय, विरोधकांच्या अशा टीकांवरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, भाजप फोडाफोडाची राजकारण करत नाही. पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोणी येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.