फक्त 6 तासांचा दिवस असलेले महाराष्ट्रातील ‘हे’ गाव माहितेय का? गावात आहे निसर्गाचा सुंदर आविष्कार , जाणून घ्या…

आपल्या राज्यात अनेक ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठे आहे. तसेच निसर्गाचे अविष्कार देखील बघायला मिळतात. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रातील एक असे गाव की त्या गावांमध्ये सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो. आणि नंतर सूर्यास्त दोन ते अडीच तास लवकर होतो. अनेकांना याबाबत माहिती नाही.

या गावात दिवसच फक्त ६ ते ७ तासांचा असतो असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हे गाव आहे. फोफसंडी असं या गावाचे नाव आहे. या गावाच्या नावाचीही रंजक गोष्ट आहे. भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा इंग्रज अधिकारी रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे.

यामुळे या गावाचे नाव फॉफसंडे असे पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले आहे. याठिकाणी अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष आहेत. या गावाला मोठा इतिहास आहे.

या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ जैववैविध्य या गावात आढळते. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. अनेकजण या गावाला भेटी देखील देतात. गावची लोकसंख्या हजार ते बाराशे आहे.

या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात शेती करायची आणि आठ महिने रोजदांरीसाठी पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात जातात. असा हा दिनक्रम आहे. गावात मुख्यतः भात, नागली, वरई पिके घेतली जातात. नंतर शेतीला पुरेसे पाणी नसते.

या गावात निसर्ग मोठा आहे, पण रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही प्रत्येकाला मिळाल्या नाहीत. शेतीला पाणी नसल्याने इतर पिके घेता येत नाही. मात्र या गावात मन प्रसन्न होत रमून जाते. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो.

दरम्यान, याठिकाणी असलेल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. यामुळे सगळीकडे हिरव्यागार झाडांची चादर पसरते.

या ठिकाणी असलेला फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे. अनेकजण याठिकाणी भेटी देखील देतात. यामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील या गावाला एकदा आवश्य भेट द्या. अनेकांना हे गाव आणि येथील चमत्कार माहिती नाही.