राज्यात सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता महाविकास आघाडीसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दोन आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हजेरी लावली. यामुळे दोघेही येत्या काही दिवसात काँग्रेसला राम राम करण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.
असे असले तरी आमदार जितेश अंतापूरकर यांनी ई-पीक पाहणी संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अंतापूरकरांनी सांगितले आहे. यामुळे येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
मी आहे तिथेच राहणार असून मला उमेदवारीही मिळणार आहे. निधीसंदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं खोसकर म्हणाले. मात्र विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्या प्रकरणी कारवाई होण्याआधीच दोघंही आमदार पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी काही कामासाठी भेट झाली असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची कामे असतात, त्यांची अशी अडवणूक करता येत नाही, असेही ते म्हणाले होते. यामुळे नेमकं काय होणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. गुप्त मतदान असल्यामुळे पक्षाला थेट कोणाकडे बोट दाखवता येत नव्हतं, मात्र याच आमदारांनी हे मतदान केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.