शिंदेंच्या १२ आमदारांचा ठाकरेंची भेट घेण्याचा प्लॅन फसला, मातोश्रीवर फोन फिरवला पण ठाकरेंनी…

राज्याच्या सत्तेत अजित पवारांचा गट सामील झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशात शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परत येतील असेही काही नेते म्हणत आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. पण आता शिवसेना पक्षामध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला शिंदे गटातील १२ आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. त्या आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या.

त्यासाठी आमदारांनी मातोश्रीवर फोनही फिरवला होता. पण उद्धव ठाकरे यांनी त्या आमदारांना भेटण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेचे कारण देत त्या आमदारांना भेटण्याचे टाळले आहे.

शिंदे गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांना याबाबत विचारण्यात आले होते. त्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांच्या गटातील १० आमदारांनी एकनाथ शिंदेंना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, असे उदय सामंतांनी म्हटले आहे.

ज्या १० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्य शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्यापैकी ६ आमदार हे लवकरच आमच्या गटात प्रवेश घेतील. मी आताही त्यांची नावे सांगू शकतो, पण राजकारणात नैतिकता पाळायची असते, असेही उदय सामंतांनी म्हटले आहे.

तसेच आमदार उद्धव ठाकरेंच्या सोबत होते. तरीही त्यांना कधी ठाकरेंना भेटता आले नाही. त्यामुळेच ४० आमदारांनी बंड करत त्यांची साथ सोडली. आमदारांचा एकनाथ शिंदेवर पुर्ण विश्वास आहे, असेही उदय सामंतांनी म्हटले आहे.