विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच शिंदेगट त्यांच्यावर संतापला; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. असे असतानाच राज्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडीही घडताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले होते. १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तीन महिने पुर्ण होतील पण अजूनही राहूल नार्वेकरांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा यासाठी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर राहूल नार्वेकरांनी शिवसेनेच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. याप्रकरणी शिंदेंच्या ४० आणि ठाकरेंच्या १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्या आहे.

असे असताना आता एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी राहूल नार्वेकरांच्या या मुदतीवर आक्षेप घेतला आहे. आमदारांच्या राजकीय भविष्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सात दिवस ही पुरेशी मुदत नाही. त्यांनी जास्त दिवसांची संधी मिळायला हवी, असे शिंदेंचे आमदार शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

तसेच तोंडी म्हणणं मांडायला सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी संधी द्यायला हवी. तसेच वकीलांच्या मार्फत युक्तिवाद करण्याची संधीही आमदारांना दिली गेली पाहिजे. आम्ही यासाठी आयोगाकडून मुदत वाढवून घेणार आहोत, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यन याप्रकणावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये याबद्दल निकाल दिला होता. त्या चौकटीमध्येच अध्यक्षांना १६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.