तीन सख्ख्या भावंडांचा एकत्र अंत, ‘ती’ इच्छा अधुरीच राहिली, आईचा मन हेलावणारा आक्रोश…

वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना झालेल्या अपघातात तिघे भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना घडली. भरधाव हायावाने दुचाकीला कट मारला. दुचाकी हायावाच्या चाकाखाली आली. यामुळे हा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, प्रतिभा अंभोरेची एमआयडीसीच्या मैदानावर वनविभागासाठी शारिरीक चाचणी होती. शारिरीक चाचणी देऊन हे तिघेजण दुचाकीवरून येत होते. मात्र येत असताना हा अपघात झाला आहे. प्रवीण भगवान अंभोरे (वय २८), प्रतिक्षा भगवान अंभोरे (वय २२), प्रदीप भगवान अंभोरे (वय २० सर्व रा. आकोली ता. जिंतूर) अशी मृत भाऊ-बहिणींची नावं आहेत.

पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने कट मारल्यामुळे तिघेजण हायवाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेनंतर हायवा चालक फरार झाला. तिघे भावंडं हे बीड बायपास येथे भाड्याने राहत होते.

प्रवीण हा एका दुकानात कामाला होता. प्रदीप हा शिक्षण घेत होता तर प्रतिभाने वनविभागात नोकरीसाठी एमआयडीसीच्या मैदानावर आज शारिरीक चाचणी दिली होती. कष्ट करून ते सगळे शिक्षण घेत होते. यामुळे त्यांच्या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिभा अंभोरेला नोकरी लागावी अशी कुटुंबीयांची इच्छा होतो. आज वनविभागासाठी शारिरीक चाचणी असल्याने ते सकाळी शारिरीक चाचणीसाठी गेले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला आणि सारी स्वप्न अधुरी राहिली. प्रतिभाच्या आयुष्यावर काळाने घाला घातला सोबतच तिच्या दोन भावंडांना देखील मृत्यूने कवटाळले.

कुटूंबाला याबाबत कळताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिन्ही पोरांना नियतीने हिरावून नेलं हे कळल्यापासून त्यांच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.