आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. माझ्या जन्मापासून ते आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम प्रमाणिकपणे केले आहे. पक्षाने मला मोठे केलं आहे, परंतु मी देखील पक्षाला मोठं करण्याचं काम केलं आहे.
त्यामुळे मला अन्य पर्याय देखील बघायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे आता त्यांच्यासोबत अनेक आमदार देखील काँग्रेस सोडणार असे म्हटले जात आहे. यावर आता मुंबईतील कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले मी काँग्रेस सोडणार नाही. माझी शेवटची शोभा यात्रा कॉंग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल, याची सर्वांनी खात्री बाळगा. भाई जगताप कॉंग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा कॉंग्रेसचा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही.
अनेक वादळ आली आणि गेली, कॉंग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आणि कोणाच्याने संपणारही नाही. पद, लालच आणि फायद्याकरीता माझा पिंड बनलेला नाही. आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही, असेही ते म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळात कॉंग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा मिळवून देऊ त्याकरिता प्रचंड कष्ट घेऊ. असेही ते म्हणाले. दरम्यान, आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांना भाजप राज्यसभेवर घेणार असल्याचे देखील माहिती आहे. आता ही यादी कधी प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात याबाबत अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत.