छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं.
पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. असे असताना मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.
असे असताना आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमच्याकडे फक्त ६ फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती, असं म्हणत कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. नौदलाने ३५ फुटांचा शिवरायांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नसल्याचेही राजीव मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवर बोलताना राजीव मिश्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणांमध्ये कला संचालनालय यांची कोणती चूक नाही. आम्ही केवळ सहा फुटाच्या पुतळ्याची परवानगी दिली होती पण ते काम नेव्हीला देण्यात आलं आणि नंतर हा पुतळा 35 फुटाचा उभारण्यात आला.
आता सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे, खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे खराब दर्जाचे काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. आता याबाबत काय कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत तपास सुरू आहे.