Divya Pahuja murder : CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह कुठे गेला? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात वेगळंच घडतंय…

Divya Pahuja murder : हरियाणातील गुरुग्राम येथील मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता हत्येप्रकरणी वापरलेली बीएमडब्ल्यू कार पंजाबमधील पटियाला येथे सापडली आहे. पोलिसांनी नवीन बसस्थानकातून कार जप्त केली आहे.

डीएसपी सुख अमृत सिंग रंधावा यांनी सांगितले की, पटियाला पोलिसांना माहिती मिळाली की गुरुग्राममध्ये मॉडेल दिव्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार वापरली गेली होती.

ही गाडी पटियालाच्या दिशेने आली आहे. या माहितीच्या आधारे सीआयए कर्मचारी आणि पटियाला पोलिसांनी शोध मोहीम राबवली. पटियाला- राजपुरा रोडवरील नवीन बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये गुरुवारी एक बीएमडब्ल्यू कार सापडली.

डीएसपीने सांगितले की येथे बीएमडब्ल्यू कोणी पार्क केली याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. दोन किंवा अधिक आरोपी असू शकतात. डीएसपी म्हणाले की गुरुग्राम गुन्हे शाखेचे पथक पटियाला येथे पोहोचले असून वाहन त्यांच्या ताब्यात दिले जाईल.

गँगस्टर संदीप गोल्डीचा पोलीस चकमकीत खून केल्याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड मॉडेल दिव्या पाहुजा जुलै 2023 मध्येच जामिनावर तुरुंगातून बाहेर आली होती. 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील हॉटेलमध्ये मॉडेलची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

या हत्येतील मुख्य आरोपी हॉटेल मालक अभिजीत सिंग आहे. पोलिसांनी त्याला दोन साथीदारांसह अटक केली आहे. पोलिसांना हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये अत्यंत महत्वाची माहिती सापडली आहे. दिव्या अभिजीत सह हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. 

2 जानेवारीला पहाटे तीन जण हॉटेलमध्ये आले. यानंतर 2 जानेवारी रोजी रात्री 10.44 वाजता दोघे ते तिघे जण चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह ओढून नेताना दिसत आहेत. यामुळे पोलीस सध्या तपास करत आहेत. तिचा मृतदेह अजून सापडला नाही.