रागात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. काही वेळा तर रागाच्याभरात लोक दुसऱ्यांचा जीवही घेतात. अशीच एक घटना जळगावमधून समोर आली आहे. मुलगा सतत उलट उत्तर देत असल्यामुळे एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:चेही जीवन संपवले आहे.
भडगाव तालुक्यातील शिवणीमध्ये ही घटना घडली आहे. जन्म दिलेल्या बापानेच १२ वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली आहे. त्यानंतर स्वत:चे जीवन संपवले आहे. संजय चव्हाण असे वडिलांचे नाव आहे तर कौशिक चव्हाण असे त्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी साधनाबाई आणि दोन मुले असा संजय चव्हाणांचे कुटुंब होते. संजय यांचा मोठा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो. तर कौशिक हा सातवीत शिकत होता. २७ जुलैला संजय यांनी त्यांच्या मुलाला काम आहे असे सांगत शेतात नेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी साधनाबाई सुद्धा सोबत होत्या.
अशात वाटेत साधनाबाईंना एक आजी भेटल्या होत्या. त्यामुळे त्या त्यांच्यासोबत गप्पा मारत होत्या. त्यामुळे शेतात जाण्यास त्यांना उशीर झाला. त्या शेतात गेल्या तेव्हा खाटेवर मुलगा पडलेला दिसला तर संजय चव्हाण झाडाला लटकलेले दिसले.
पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संजय चव्हाण यांनी रागातून असे केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कौशिक घरातून पैसे घेत असल्यामुळे आणि सतत उलट उत्तर देत असल्यामुळे संजय चव्हाण यांना त्याचा राग आला होता. त्यामुळे त्यांनी मुलाचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर त्यांनी स्वत:चेही जीवन संपवले. आता याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.