Elvish Yadav : ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव आता चांगलाच अडचणीत आला आहे. आता एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप करणाऱ्या पाच गारुडींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सापांचे काही विष देखील जप्त करण्यात आले.
यावेळी त्यांनी हे विष एल्विश यादव याला पुरवायचे असल्याचे सांगितले. यामुळे हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता एल्विश यादवसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुल, टिटुनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
याबाबत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याची माहिती मिळाली होती.
या पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींना नियमित बोलावले जाते आणि ते सापाचे विष आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करतात. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या माहितीवरून आमच्या एका माहितीदाराने एल्विश यादवशी संपर्क साधला.
त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने त्याच्या एजंट राहुलचा फोन नंबर दिला आणि माझं नाव सांगून बोला, तो सर्व व्यवस्था करेल असे सांगितल्याची माहिती आहे. यामुळे तो आता अडकला आहे.